*पोलिसांकडून पत्रकारांवर हल्ले वाढले, गेल्या दोन दिवसात सात घटना, मिडियात मोठा संताप*
*मुंबई* : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवत पत्रकारांवरचा जुना राग काढण्याची एकही संधी राज्यातील पोलीस सोडत नाहीत असे आज चित्र आहे.. गेल्या दोन दिवसात किमान अशा सहा घटना समोर आल्या आहेत..
ताजी घटना हिंगोलीतील आहे.. न्यूज 18 लोकमतचे पत्रकार कन्हैयालाल खंडेलवाल यांना एका पीआयने आज बेदम मारहाण केली.. 11 ते 1 ची वेळ संपण्यापूर्वीच पोलीस ग्रामीण भागातील जनतेला मारहाण करू लागले होते.. त्याचे चित्रिकरण खंडेलवाल आपल्या मोबाईलवरून करीत संबंधित पीआय ने त्यांना मारहाण करायला सुरूवात केली.. नंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊनही मारहाण केली गेली.. त्यात खंडेलवाल जबर जखमी झाले.. नंतर त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले.. विषय एवढ्यावरच संपला नाही.. खंडेलवाल यांनीच पोलीस ठाण्यात आपल्या डोक्यावर दगड घातल्याचे दाखवत स्वतः पीआय देखील रूग्णालयात दाखल झाले.. या प्रकरणाने हिंगोलीतील मिडियात मोठीच संतापाची लाट पसरलेली आहे..काही दिवसांपुर्वी वाहतुकीच्या संदर्भातली एक स्टोरी खंडेलवाल यांनी लावली होती.. तो राग डोक्यात ठेऊन ही मारहाण केली गेल्याचा स्थानिक पत्रकारांचा आरोप आहे..
अर्थात ही काही पहिली आणि एकमेव घटना नाही.. गेल्या दोन दिवसात असे पाच सहा प़कार घडलेले आहेत..
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिंह घोणे आपल्या कार्यालयात जात असताना त्यांना आडवून बेदम मारहाण केली गेली.. मी पत्रकार आहे, जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे असे वारंवार सांगत असतानाही पोलीस त्यांना मारहाण करीत राहिले..
टिटवाळा येथे एका पत्रकाराने कोरोनाच्या संशयित रूगणाबददलची बातमी दिली.. त्यावरून शासकीय आदेशाचा भंग आणि अशीच काही कलमं लावून संबंधित पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले..
बीडमध्ये एका वाहिनीचे पत्रकार मुधोळकर यांनी एक फेसबुक पोस्ट टाकल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.. एस. पी. च्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले मुधोळकर फरार असल्याचे दाखवून कोणतेही सर्च वॉरन्ट नसताना बीडमधील काही दैनिकांच्या ऑफिसची झाडाझडती घेतली गेली.. काय शोधताय अशी विचारणा केल्यानंतर एक मोबाईल चोर फरार असून त्याचं लोकेशन इथं दाखवत असल्याचे सांगितले गेले..औरंगाबाद जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे..
पत्रकारांवर पोलिसांकडून होणारे हे हल्ले संतापजनक आणि निषेधार्ह आहेत.. एकीकडे मुख्यमंत्री, केंद्रीय माहिती मंत्री पत्रकारांना मारहाण करणारया पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे इशारे देत आहेत.. पण पोलिसांवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही.. तेव्हा या प्रकरणी मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालून पत्रकारांना मारहाण करणारया पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे..